Article Body
आज, 5 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रात विविध ठिकाणी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत जुगार प्रकरण, बीडमधील शिवभोजन केंद्रावर कारवाई, शिवसेना-मनसे यांची एकत्र बैठक, परभणीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि नाशिकमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग अशा बातम्यांवर आमचा थेट आढावा Live Blog स्वरूपात सादर करत आहोत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कार्यालयात कर्मचारी जुगार खेळताना सापडले; संतापाची लाट
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयात काही कर्मचारी कामाच्या वेळेत पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले आहेत. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
सार्वजनिक करातून पगार घेणारे कर्मचारी कार्यालयात जुगार खेळत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. ई-प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून, प्रशासन या प्रकरणी पुढील कारवाईसाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.